जय...
मी पाहिलं होतं तिला खूप खूप पूर्वी
मला पाहून ती गोड हसली होती
चिमुकल्या हातात तिच्या
माझा हात अडकला होता
इवल्याश्या हास्यात तिच्या
साऱ्या विश्वाचा आनंद होता.
निघून गेली ती आईबरोबर तिच्या
मला वाटलं भेट होणार नाही पुन्हा...
मग मी तिला विसरलो ती मला
दिवसांवर दिवस जात राहिले
वर्ष कशी गेली कळलंच नाही मला.
धाड! धाड! कानठळ्या! आक्रोश किंकाळ्या
आगीत होरपळणाऱ्या जीवांचं रडणं! मृत्यूचा तो तांडव कोणी घडवून आणला,
त्या गोंडस बाळांना गोळ्या झाडताना काहीच का वाटलं नाही त्यांना..?
धर्मरक्षक म्हणत होते स्वतःला म्हणून माणुसकीचा गळा घोटला?
सर्वांचे संसार जाळून तोडून ह्यांनी कोणता धर्म जगवला?
विचारांच्या वादळात समोरची आग शांत झाली होती
दगडासारखी माणसं माणुसकीचे अवशेष काढत होती.
तेवढ्यात मी पाहिले, काळजात धस्स झाले..
पटत नव्हते तरी जवळ जाऊन पाहिले
तीच! हो! तीच होती ती!
चिमुकले हात मोठे झाले होते
चेहऱ्यावरचे हास्य मात्र तसेच होते..
माणुसकीचं निर्मळ हास्य त्यांना
कधीच मिटवता येणार नव्हते
त्यांना हवे ते त्यांना चुकूनही मिळणार नव्हते.
विजयी मुद्रेने मी वर पाहिले...
धर्मरक्षकांचा नेहमीसाठी पराजय झाला होता
त्यांनी केलेल्या जखमेचा व्रण नाहीसा होत होता..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment